

अमरावती : मेळघाटातील धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळेत शनिवारी (दि. २५) दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, शाळेतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अन्नविषबाधा झाल्याचा संशय असून सर्वांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून वैद्यकीय उपचारांचा सविस्तर आढावा घेतला.
या दुर्दैवी घटनेनंतर आश्रमशाळांना अन्न पुरवणाऱ्या 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळेच ही घटना घडल्याचा आरोप पालकांकडून व स्थानिक नागरिकांकडून होत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा धारणी दौरा आजच आयोजित करण्यात आल्यामुळे या घटनेला विशेष गांभीर्य प्राप्त झाले आहे. शिंदे सेनेचे जिल्हा संघटक मन्ना दारसिंबे यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.