Online Fraud Pudhari
अमरावती

Online Fraud | आंतरराज्यीय टोळीतील तिघे जेरबंद ; ज्येष्ठ नागरिकाची १३.८७ लाखांची ऑनलाइन फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाची १३.८७ लाखांची ऑनलाइन फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १३ लाख ८७ हजार ७०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणात आली होती. या प्रकरणी आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यात अमरावती शहर सायबर पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथून तीन आरोपींना (दि.१२) अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईल, बँकिंग साहित्य व इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

 अमरावतीत सक्करसाथ परिसरातील रहिवासी सुधीर बालकृष्ण भंडारी यांनी यापूर्वी एका वित्तीय संस्थेकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले होते. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये स्वतःला वित्तीय कंपनीचा प्रतिनिधी सांगणार्‍या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर प्रक्रिया शुल्क, फाईल मंजुरी, अधिकारी शुल्क आणि इतर कारणे सांगत आरोपींनी वेळोवेळी पैसे मागितले.'पैसे भरले नाहीत तर कर्ज रद्द होईल, आधी भरलेली रक्कमही परत मिळणार नाही,' अशा धमकीवजा संदेशांमुळे भंडारी यांनी विविध खात्यांमध्ये एकूण १३.८७ लाख रुपये जमा केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण करताना या फसवणुकीचे धागेदोरे उत्तर प्रदेशातील नोएडा येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विशेष पथक दिल्ली-नोएडा येथे रवाना करण्यात आले. तपासादरम्यान कमलेश दाताराम शर्मा याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून राहुल ठाकुरप्रसाद पांडे आणि छोटलाल कल्लू यांची नावे समोर आली. पोलीस त्यांच्या मागावर असतानाच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दोघांनाही नोएडा येथून अटक करण्यात आली.मोबाईल, बँक कार्डसह साहित्य जप्त-अटक आरोपींकडून विविध कंपन्यांचे सहा मोबाईल हँडसेट, तीन चेकबुक, ११ डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, पासबुक आदी साहित्य जप्त करण्यात आले. तसेच २६ हजार रुपयांची रक्कम होल्ड करण्यात आली आहे.

आरोपी हे सायबर गुन्हे करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असल्याचे तपासात समोर आले असून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड घेऊन पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे आणि पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांच्या नेतृत्वातील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT