

मालेगाव : येथील तरुणांना सौदी अरेबियातील उमरा यात्रेदरम्यान खिदमत (सेवा) कामासाठी परदेशात पाठविण्याचे आमिष दाखवित तब्बल चार लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी स्वतःला मुंबईस्थित मुरादा इंटरनॅशनल एचआर कन्सल्टन्सी या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. तपासात संबंधित नावाची कोणतीही अधिकृत कंपनी अस्तित्वात नसल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी शेख इम्रान अब्दुल जब्बार (रा. मालेगाव) यांनी दि. १० जानेवारी २०२६ रोजी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे परिचित आसिफ इकबाल यांच्या माध्यमातून नाशिक येथील अनिसा जावीद खान आणि सगिरा इम्रान पटेल (दोघे रा. पखाल रोड, नाशिक) यांच्याशी संपर्क झाला होता. उमरा यात्रेदरम्यान सेवा देण्यासाठी तरुणांची आवश्यकता असल्याचे सांगत आरोपींनी व्हिसा, तिकीट व नोकरीची हमी दिली होती. या आमिषाला बळी पडून मालेगावातील १३ तरुणांना सौदीत पाठविण्याची तयारी करण्यात आली होती. त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ऑनलाइन व रोख स्वरूपात ४ लाख ९९ हजार रुपये आरोपींना देण्यात आले. मुंबईतील एका मेडिकल सेंटरमध्ये संबंधित तरुणांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपींनी व्हॉट्स अॅपद्वारे पाठविलेले व्हिसा संशयास्पद वाटल्यामुळे फिर्यादींनी चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर पैसे परत करण्याची मागणी केली. आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. नंतर दिलेला बनादेशही खात्यात रक्कम नसल्याने बाउन्स झाला. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, पैसे मागितल्यावर आरोपींकडून धमकावण्याचाही प्रकार झाला, तिकीटही मिळणार नाही आणि पैसेही परत मिळणार नाहीत, जे करायचे ते करा, असे आरोपींनी सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विशेष म्हणाजे, तक्रार दिल्यानंतरही रीतसर गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल दोन महिने लागल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. आरोपींनी मालेगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याचे समजते. तरीदेखील अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित आरोपी आजही सौदी, दुबईसह विविध देशांत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांशी संपर्क साधत आहेत. या माध्यमातून आणखी अनेकांची फसवणूक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या सात महिन्यांपासून आम्ही पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहोत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही कारवाई होत है नसल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होत आहे. अशी खंत फिर्यादींनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून अशा बनावट परदेशी रोजगार रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे.
पोलिस निरीक्षक राहुल खाताळ यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, घटनेतील आरोपीचा शोध सुरू असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथकांकडून विविध ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच दोन्ही आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वासही खताळ यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.
नोव्हेंबर २०२५ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी १० जानेवारी रोजी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपींनी मालेगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने २ मे रोजी फेटाळून लावला, न्यायालयाचा निर्णय होऊन १५ दिवस उलटूनही आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.
- शेख इम्रान, फिर्यादी, मालेगाव