Congress Meeting In Amravati
अमरावती येथीस बैठकीत उपस्थित काँग्रेस नेतेमडंळी Pudhari Photo
अमरावती

अमरावती| राज्यातल्या सत्ताबदलाचे हादरे केंद्रामध्ये बसणार : रमेश चेन्नीथला

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा:

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना निर्णय मुंबईत बसून घेतले जाणार नाही. तर स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप केले जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी (दि.१४ ) अमरावतीमध्ये दिली. विधानसभा निवडणुकीची अमरावती व यवतमाळ जिल्हा पूर्वतयारी आढावा बैठक अमरावती येथील ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री तथा आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. पण विधानसभेची लढाई सोपी नाही. केंद्रात आणि राज्यात विरोधकांची सत्ता आहे. महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून, राज्यातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही बसणार आहेत, असेही प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

काँग्रेस हा राज्यात मोठा पक्ष

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हा राज्यात मोठा पक्ष झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असून महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या असून त्या ठिकाणी कृषी मंत्री असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज्यातील सत्ताधारी सरकार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. येणार्‍या काळात राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेत येईल असा दावा चेन्नीथला यांनी केला.

आम्हाला मिडियामधले मुख्यमंत्री नकोत : नाना पटोले

बैठकी दरम्यान बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात सध्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न महत्त्वाचा नाही. तर त्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि धर्माचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र वाचवणं हे काँग्रेसला अत्यंत महत्त्वाचं वाटत असून महाविकास आघाडीमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री निवडून आणू शकतो. लोकशाही पद्धतीने आमदारांमधून मुख्यमंत्री निवडला जाईल. त्यामुळे आम्हाला मीडियातले मुख्यमंत्री नकोत अशी तिखट प्रतिक्रिया यावेळी पटोले यांनी व्यक्त केली

अमरावती काँग्रेसचा बालेकिल्ला : आ.यशोमती ठाकूर

अ‍ॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मधल्या काळात काही अडचणी आल्या होता. पण आता पुन्हा एकदा काँग्रेसने आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे आगामी काळात अमरावती जिल्ह्यातून काँग्रेसला जास्तीत जास्त मदत निश्चित मिळेल. अमरावती जिल्हा आणि विदर्भात पक्षाने जास्तीत जास्त महिलांना संधी द्यावी अशी विनंती यावेळी अ‍ॅड.ठाकूर यांनी केली.

SCROLL FOR NEXT