पुढारी ऑनलाईन डेस्क : Budget 2024 : एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवारी सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर काही वेळातच माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांची प्रतिक्रिया आली. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर काँग्रेसच्या लोकसभा जाहीरनामा 2024 मधून कल्पना चोरल्याचा आरोप केला. चिदंबरम आणि जयराम रमेश यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या काही योजनांची काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या प्रस्तावांशी तुलना करून सरकारवर निशाणा साधला. आता प्रश्न असा आहे की काही कल्पना काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून प्रेरित असतील तर माजी अर्थमंत्री हा अर्थसंकल्प 'चांगला' मानत आहेत का? दरम्यान, चिदंबरम यांनी अर्थसंकल्पातील अनेक प्रस्तावांचे कौतुक केल्याची चर्चा रंगली आहे.
चिदंबरम म्हणाले, ‘निवडणूक निकालानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचून दाखवला आहे. याचा मला आनंद झाला आहे. खरतंतर त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पृष्ठ 30 वर नमूद केलेली रोजगार-लिंक्ड प्रोत्साहन निधी (ELI) ही योजना जवळजवळ स्वीकारली आहे. तसेच पान 11 वर नमूद केलेल्या प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला भत्ता देण्याच्या तरतुदीसह त्यांनी शिकाऊ योजना सुरू केली आहे.’
चिदंबरम पुढे म्हणाले, ‘अर्थमंत्री सीतारामन यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या इतर कल्पनाही कॉपी केल्या असत्या तर बरे झाले असते. मी लवकरच त्याची यादी सादर करेन.’ सर्व गुंतवणूकदारांसाठी एंजेल टॅक्स रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर चिदंबरम यांनी मत मांडले. ते म्हणाले की, ‘अर्थमंत्र्यांनी एंजेल टॅक्स रद्द केल्याचा मला आनंद आहे. काँग्रेस अनेक वर्षांपासून ते रद्द करण्याची मागणी करत आहे. याबाबत काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पान 31 वर त्याचा उल्लेख आहे.’