Amravati bird watching
अमरावती : जगातील सर्वांत लांब नॉन-स्टॉप उड्डाण करणारा म्हणून ओळखला जाणारा ‘बार-टेल्ड गॉडविट’ हा दुर्मिळ स्थलांतरित पक्षी अमरावतीत पहिल्यांदाच दिसून आला आहे. नांदगावपेठजवळील बोर बांध आणि अमरावती विद्यापीठ परिसरातील तलावावर या पक्ष्याचे दर्शन झाल्याने स्थानिक पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाची लहर आहे.
सायबेरिया, अलास्का आणि टुंड्रा हे त्याचे मूळ निवासस्थान असून भारतात तो प्रामुख्याने मुंबई व कोकण किनारपट्टीवर दिसतो. त्यामुळे विदर्भातील ही नोंद विशेष मानली जात आहे.
लांब पाय, थोडी वर वळलेली चोच आणि शेपटावरील आडव्या पट्ट्यांमुळे ओळखला जाणारा हा पक्षी साधारण ३७–४१ सेमी लांबीचा आणि ७०–८० सेमी पंख फैलावाचा असतो. तो समुद्री किडे, जंत, शंख-शिंपले खातो आणि लांब चोचेच्या सहाय्याने गाळात खोलवर अन्न शोधतो.
या पक्ष्याची खासियत म्हणजे त्याची अतुलनीय सहनशक्ती. तो अलास्का–न्यूझीलंड दरम्यान तब्बल ११ ते १२ हजार किमी अंतर ८–१० दिवस न थांबता पार करतो, म्हणूनच तो जगातील सर्वात लांब नॉन-स्टॉप माइग्रेशन करणारा पक्षी मानला जातो.
बोर बांध परिसरात हा पक्षी प्रथम पाहिल्यानंतर डॉ. तुषार आंबडकर, अमित सोनटक्के, विनय बढे व यादव तरटे यांनी तीन–चार दिवस निरीक्षण करून त्याचे छायाचित्रण करण्यात यश मिळवले. हवामानातील बदल वा स्थलांतर मार्गातील विचलनामुळे हा पक्षी विदर्भात आला असावा, असे पक्षीप्रेमींचे मत आहे.