

Amravati Teachers MLC Election
अकोला : अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी व तहसील स्तरावर प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण 4 हजार 883 मतदारांची नोंदणी झाली आहे.
मतदार यादी सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि.18 डिसेंबरपर्यंत प्रारुप मतदार यादीवर नमुना क्रमांक 19 मधील अर्जांमध्ये दावे व हरकती संबंधित उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे तहसीलदार तथा पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे दाखल करता येतील.
अद्याप पात्र शिक्षक सदर मतदार यादीमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी राहिले असल्यास त्यांना दि. 18 डिसेंबरपर्यंत नमुना 19 मधील अर्ज आवश्यक त्या पुरावा कागदपत्रांसह अकोला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात दाखल करता येतील.
प्राप्त दावे व हरकती निकाली काढून दि. 12 जानेवारी 2026 (सोमवार) अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.