अमरावती: शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) कार्यालयात चक्क एका बिबट्याने मध्यरात्री घुसून पहाटेपर्यंत मुक्त संचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री घडलेला हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे
येथील वडाळी परिसरात एसआरपीएफचे मुख्य कार्यालय आहे. शनिवारी (दि. २१) रात्रीच्या सुमारास एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या कार्यालयाच्या आवारात शिरला आणि थेट मुख्य इमारतीत दाखल झाला. पहाटेपर्यंत तो कार्यालयाच्या वेगवेगळ्या भागांत आरामात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. ही बाब निदर्शनास येताच तातडीने वनविभागाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.
वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत हा बिबट्या तेथून निसटला होता. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली असता, बिबट्याने जवळच असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उंच कंपाऊंडवरून उडी मारून पलीकडील दाट झाडीत पळ काढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
अलिकडच्या काळात वडाळी आणि पोहरा जंगल परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार, पोहरा-चिरोडीच्या जंगलात सुमारे २० बिबट्यांचा वावर आहे. जंगलातील नैसर्गिक शिकारीची कमतरता आणि मानवी वस्त्यांमध्ये सहज उपलब्ध होणारे खाद्य, विशेषतः कुत्र्यांची शिकार, यांमुळे बिबटे शहराकडे आकर्षित होत आहेत. यापूर्वीही विद्यापीठ परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या असून, त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना अधिक सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या सहसा माणसांवर हल्ला करत नाही, मात्र त्याला धोका वाटल्यास किंवा डिवचल्यास तो आत्मसंरक्षणासाठी हल्ला करू शकतो. त्यामुळे खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
रात्रीच्या वेळी अनावश्यक घराबाहेर फिरणे टाळावे.
लहान मुले आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी.
आपला परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून वन्य प्राणी आकर्षित होणार नाहीत.
बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ न जाता किंवा त्याला त्रास न देता तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी.
वाढते शहरीकरण आणि वन्यजीवांचा अधिवास यांतील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.