

Amravati District Cooperative Bank
अमरावती: शेतकरी व दिव्यांगांसाठी अन्न त्याग आंदोलन करणारे प्रहार प्रमुख बच्चू कडू यांनी उपोषण स्थगित करताच त्यांच्यावर विभागीय सहनिबंधकांनी कारवाई करत जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरून त्यांना अपात्र ठरविले आहे. एका प्रकरणात न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत हा निर्णय सहनिबंधकांनी दिला आहे.
2017 रोजी नाशिक मध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत माजी आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या नियमानुसार जर संचालकाला एक वर्षाची शिक्षा सुनावली गेली असेल, तर तो व्यक्ती संचालक पदी कायम राहण्यास अपात्र ठरतो. या नियमाचा आधार घेत जिल्हा सहकारी बँकेच्या विरोधी गटातील बारा संचालकांनी बच्चू कडू यांच्या विरोधात विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होते. त्यावेळी बच्चू कडू यांना दिलासा देखील देण्यात आला होता. आता पुन्हा विभागीय सहनिबंधकांनी न्यायालयाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम राहण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे सरकारकडून बच्चू कडू यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.
आंदोलनाच्या आधीपासून माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात होता. बँकेतील संचालकांकडून देखील मला सांगितलं जात होतं की तुम्ही बोलू नका, नाहीतर अडचणी निर्माण होतील. राज्याच्या मुख्य माणसाच्या केबिनमध्ये जिल्ह्यातील दोन आमदार भेटले, तेथे चर्चा झाली. त्या ठिकाणी सप्टेंबर पर्यंत बच्चू कडू कसे जेलमध्ये जातील, याची व्यवस्था करा, असे सांगितले गेल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
प्रशासकीय स्तरावर बच्चू कडू यांच्या संदर्भात काही सापडते काय ते पहा. आणि त्यांचा बंदोबस्त करा, असे सांगितले गेले, त्यामुळे आता खरी सुरुवात झाली आहे. आणि आम्हाला देखील हे अपेक्षित होते, ते सर्व राजकीय दृष्ट्या करतात यात काही नवल नाही, असेही बच्चू कडू म्हणाले. आता हे सर्व झाल्यावरही आम्ही लढलो आणि टिकलो. तर ही आमची परीक्षा ठरेल. आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार असून या परीक्षेमधून आम्ही उजळून बाहेर निघू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.