बच्चू कडू  
अमरावती

Bacchu Kadu | ‘ते’ वक्तव्य संताप, दुःख आणि वेदनेपोटी आणि मी त्यावर ठाम : बच्चू कडू

छत्रपती संभाजी महाराजांसह आमदारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत वादग्रस्त विधाने केली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बोलत असताना रविवारी (दि.१९) त्यांनी आमदारांना कापून टाका, असा सल्ला शेतकर्‍यांना दिला होता. तसेच वतनदारी बंद केली म्हणून सासर्‍यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना मारले, अशा आशयाचं वक्तव्य बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात केला होता. त्यांच्या दोन्ही विधानावर आता वाद निर्माण झाला असून राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.

दरम्यान आता छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर आज सोमवारी (दि.२०) बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्यातून आलेली भावना संताप,दुःख आणि वेदनेपोटी आहे आणि मी त्यावर ठाम आहे, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. असचं सुरू राहिलं तर आम्ही ठोकणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ते म्हणाले, वतनदारी शेतकर्‍यांच्या हिताची नव्हती. ती लुटीचे तंत्र होते. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी वतनदारी बंद केली. सासर्‍यांनी वतनदारी मागितली तरी संभाजीराजेंनी ती दिली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचालींची खबर औरंगजेबाला देण्याचे काम सासरच्या मंडळींनी केले, त्यामुळे त्यांची माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचविण्यात आली. हा इतिहास आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

दुःखं हे आहे जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा राजकीय प्रतिक्रीया आल्या नाही. तेव्हा मिडियाने देखील दाखवलं नाही. एवढं बोलल्याने तुम्हाला झोंबत असेल तर ज्याच्या घरी मरण येत त्याच्या घरी काय स्थिती असेल, त्या शेतकरी बांधवाच्या यातना काय असतील दुःखं काय असेल. त्याबाबत काहीच नाही वाटत का, असा सवालही त्यांनी राज्यकर्त्यांना व सत्ताधारी पक्षातील आमदारांना विचारला आहे. तसेच असचं सुरू राहिलं तर आम्ही ठोकरणारच आहोत असा इशाराही त्यांनी दिला.

आतापर्यंत साडेसहा लाख शेतकरी मरण पावले, मग यांना काय पुजा करण्यासाकरिता ठेवले का, यांना शेतक-यांनीच निवडून दिले, मात्र यांना पार्टी महत्वाची वाटते शेतकरी नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्यातून आलेली भावना संताप, दुःख आणि वेदनेपोटी आहे आणि मी त्यावर ठाम आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

‘पूर्वी वतनदारी चालत होती. ही वतनदारी बंद केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज सासर्‍यांकडून मारले गेले. नाव औरंगजेबाचे घेतले गेले. मात्र अप्रत्यक्ष हात आपल्याच लोकांचे होते. राजा असा हवा. तो मरण पत्करायला तयार झाला. पण त्यांनी सासर्‍याला वतन दिले नाही.’ असे स्पष्टीकरण आमदार बच्चू कडू यांनी दिले.

आम्ही राजकीय लोक तुम्हाला जाती-पातीच्या वादात अडकवून ठेवू. पण शेतकर्‍यांनी त्यांचे हित कशात आहे, हे पाहिले पाहिजे. शेतकर्‍यांना आज कमी भावात सोयाबीन विकावे लागत आहे. आम्ही शेतकर्‍यांसाठी आंदोलन करतो पण शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवतात. शेतकरी जर अन्याय सहन करण्यासाठी तयार असतील तर त्यांनी तसे जाहीर करून टाकावे, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली.

‘माजी शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकर्‍यांसाठी जीवाचे रान केले. शेतकर्‍यांनीच त्यांना निवडणुकीत पाडले. मलाही शेतकर्‍यांनीच पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही निवडणुकीत पराभूत केले. शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. पण त्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे’, असे विधान बच्चू कडू यांनी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT