Paratwada obscene video case  Pudhari
अमरावती

Amravati Crime | परतवाडा अश्लील व्हिडिओ प्रकरण: शंभरहून अधिक तरुणींना जाळ्यात ओढल्याचा संशय; आरोपीला अटक

भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलीस कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Paratwada obscene video case

अमरावती : राज्यात अशोक खरात प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एका १९ वर्षीय तरुणाचे सहा वेगवेगळ्या तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद याला सोमवारी (दि.१३) उशीरा रात्री ताब्यात घेतले आहे.

अनेक तरुणींना प्रेमजालात फसवून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचा आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर जुळ्या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून भाजपासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी लावून धरली होती.

या धक्कादायक प्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला होता. मुख्य आरोपी अयान अहमद याने परिसरातील १०० पेक्षा जास्त तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले असून त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कामात एक मोठे रॅकेट सक्रिय असून मुलींचे व्हिडिओ तयार करून त्यांना वेश्या व्यवसायासाठी धमकावले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रकरण उघडकीस येताच आरोपी अयान अहमद आपल्या कुटुंबासह फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि जिल्ह्यातील व्हॉट्सॲप तसेच स्नॅपचॅटच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी केली. मुलींच्या शोषणामागे असलेल्या मोठ्या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत त्यांनी निवेदनातून आग्रही मागणी केली. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

व्हिडिओमधील काही तरुणी अल्पवयीन असण्याची शक्यता असल्याने, पीडित कुटुंबीयांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे, तक्रारदारांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या रॅकेटमध्ये अजून कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT