अमरावती : नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतांनाच अकोट येथे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अलमास परवीन शेख सलीम (अकोट) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. परतवाडा चांदूरबाजार मार्गावर तोंडगावजवळ आज शनिवार २९ नोव्हेंबरला हा अपघात झाला. यात पती शेख सलीम आणि मुलगा देखील जखमी आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर अकोट मध्ये होणारे सर्व प्रचार कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित पवार गट नगरसेवक पदाच्या महिला उमेदवार अलमास परविन शेख सलीम शनिवारी सकाळी अकोला जिल्ह्यातील अकोट वरून त्यांचे पती आणि मुलासोबत त्यांच्या चांदूरबाजार तालुक्यातील शिंदी बु. येथील माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या.
या दरम्यान परतवाडा चांदूरबाजार मार्गावर तोंडगाव जवळ एका ट्रकने त्यांच्या होंडा शाईन दुचाकी एमएच २७ बीके ४९२० ला जोरदार धडक दिली. त्यात अलमास परवीन यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर पती आणि मुलगा जखमी आहे. त्यांच्यावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अल्मास परवीन शेख या अकोट नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात शोकाकूल वातावरण आहे.