

अमरावती : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दर्यापूर-अकोला मार्गावर गोळेगाव फाट्याजवळ मंगळवारी (दि.४) दुपारी १२:३० वाजता दरम्यान घडली. पाडुरंग गणेश राठोड (वय ४६ रा. खोलापुर गेट दर्यापूर ) व मंगेश रामेश्वर जायले (वय ४४, रा.रविनगर, अमरावती) अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत.
पांडुरंग राठोड हे दुचाकी क्र (एमएच २७ डी.बी.८९१९) ने आपल्या मुलीची प्रसुती झाल्यामुळे अकोला येथे भेटण्यासाठी जात होते. तर त्याचवेळेस अमरावती येथून मंगेश जायले हे दुचाकी क्रमांक एम.एच.२७डी.जे.१७२७ ने दर्यापूर मार्गे कट्यार गावाला सासुरवाडीला जात होते. दरम्यान गोळेगाव फाट्यानजिक दोन्ही दुचाकींचा अपघात झाला. दोन्ही दुचाकी चालकांना डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे पाठविण्यात आले. नेमका अपघात कसा झाला? याचा अधिक तपास दर्यापूर पोलिस करीत आहेत. मागील ३ दिवसात दर्यापूर तालुक्यात दोन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि. २) दर्यापूर मूर्तिजापूर मार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतांना आज (मंगळवारी ) दुसर्या अपघातात पुन्हा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.