अमरावती

Amravati crime | दारूच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

हा थरार पाहून नितीनसोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तातडीने गावात धाव घेतली

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : दारू पिण्यातून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची खळबळजनक घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना गावात (दि.३) घडली आहे. एका ३० वर्षीय तरुणाची लोखंडी सत्तूर, फावडे आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. नितीन मोरेश्वर भगत (वय ३०, रा. राजना) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर प्रफुल सुभाष राऊत (वय २६) आणि रोशन विश्वासराव मेश्राम (वय ३०, दोघेही राहणार राजना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक नितीन भगत हा राजना परिसरातील मोहम्मद आसिफ मोहम्मद खालीद यांच्या शेतात ट्रॅक्टरने शेणखत टाकण्याचे काम करत होता. त्याच्यासोबत गावातील मयूर चौधरी, सुरज मेश्राम, बाळकृष्ण मेश्राम आणि प्रवीण मेश्राम हे देखील काम करत होते. रात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी रोशन मेश्राम आणि प्रफुल राऊत यांनी नितीनला फोन केला आणि ते थेट शेतात पोहोचले. तिथे त्यांनी नितीनला 'तू आम्हाला दारू पाजतो का?' असे विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की दोन्ही आरोपींनी नितीनवर लोखंडी सत्तूर आणि फावड्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर एका मोठ्या दगडाने त्याचे डोके ठेचून त्याला जागीच ठार मारले.

हा थरार पाहून नितीनसोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तातडीने गावात धाव घेतली आणि नितीनचा भाऊ प्रवीण मोरेश्वर भगत याला घटनेची माहिती दिली. भावाने तात्काळ गावच्या पोलीस पाटलांना आणि पोलीस पाटलांनी चांदूर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. गुरुवारी सकाळी पोलिसांना आदिशक्ती ढाब्यासमोर नितीन भगतचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली. चांदूर रेल्वे येथून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींवर बीएनएस कायदा कलम १०३ (१) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितेश आंधळे, रोहित कुदळे, नंदलाल लिंगोट, शिवाजी, वसंत, योगेश, स्वप्निल, भागवत आणि निलेश यांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT