

टिटवाळा: कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हारळगाव परिसर शुक्रवारी रात्री झालेल्या थरारक हत्याकांडाने हादरून गेला. रविंद्र उर्फ पिंटया उर्फ डोक्या यशवंत अहिरे या 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत रविंद्र अहिरे हा म्हारळगाव परिसरात वास्तव्यास होता. त्याचा भाऊ राहुल यशवंत अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक सुखदेव डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या हत्याकांडामागे जुन्या वादातून आणि पोलिसांत तक्रार करण्यास सांगितल्याच्या रागातून कट रचण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक डांगे याच्याविरोधात एका महिलेला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास रविंद्र अहिरे याने सांगितले होते. याच कारणाचा आरोपींनी मनात राग धरला होता. अखेर शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास म्हारळगाव येथील मलखांब कंपाऊंड परिसरात आरोपींनी रविंद्रला गाठले आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.
आरोपींनी धारदार शस्त्राने रविंद्रच्या पोटावर, डोक्यावर, चेहऱ्यावर, पाठीमागील भागावर तसेच शरीराच्या विविध अवयवांवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रविंद्रला नागरिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या भीषण हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर म्हारळगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेत अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांनी या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या हत्येमागे आणखी कोणते कारण दडले आहे का, आरोपींनी नेमके कोणते शस्त्र वापरले, तसेच मृत आणि आरोपींमध्ये पूर्वीपासून वाद होता का याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या थरारक हत्याकांडामुळे म्हारळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.