Amravati Municipal Election updates  pudhari photo
अमरावती

Amravati Municipal Election | अमरावती महापालिकेत धक्कादायक निकाल, भाजपला नाकारले, स्पष्ट बहुमत कुणालाच नाही

Amravati Municipal Election | अमरावती महापालिकेत धक्कादायक निकाल, भाजपला नाकारले, स्पष्ट बहुमत कुणालाच नाही

पुढारी वृत्तसेवा

Amravati Municipal Election latest updates

अमरावती : अमरावती महापालिकेच्या मतदानानंतर शुक्रवारी 16 जानेवारी रोजी नवसारी येथील क्रीडा संकुलात 22 प्रभागातील 87 जागांची मतमोजणी करण्यात आली. त्यापैकी 71 जागांचे निकाल हाती आली आहेत. त्यामध्ये 23 जागा जिंकून भाजप पहिल्या स्थानी आहे. मात्र मागील निवडणुकीतील भाजपच्या 45 जागांवरचा विजय पाहता भाजप 25 चा आकडा पार करणार किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. भाजप खालोखाल काँग्रेस 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 13, युवा स्वाभिमान पक्ष 4, एम आय एम 9, बहुजन समाज पक्ष 3, शिवसेना शिंदे गट 3, शिवसेना ठाकरे गट 1, वंचित एका जागेवर विजयी आहे.

'या' ठिकाणी भाजपला मोठा धक्का

अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा देखील पराभव झाला आहे. यासह साईनगर प्रभागात मुख्यमंत्र्यांच्या जवळचे समजले जाणारे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय हे देखील पराभूत झाले आहे. साईनगरातील लढत सर्वात महत्त्वपूर्ण मानली जात होती. कारण येथे युवा स्वाभिमान कडून सचिन भेंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या पराभवात तुषार भारतीय यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात होते. त्यामुळे आपल्याला पराभूत करणाऱ्यांचा महापालिका निवडणुकीत पराभव करणार, असा जाहीर इशारा नवनीत राणा यांनी दिला होता. अपेक्षेप्रमाणे युवा स्वाभिमानचा उमेदवार चार हजारांच्या मताधिक्याने निवडून आला आहे.

भाजपला यामुळे बसला फटका

2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपला 87 पैकी 45 जागांवर विजय मिळाला होता. त्या जागा कायम ठेवणे भाजपला 2026 मध्ये जमले नाही. याला कारण म्हणजे भाजपने ही निवडणूक कार्यकर्त्यांना गृहीत धरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढविण्याचा प्रयत्न केला. चक्क भाजपच्या निरीक्षकांनी देव, देश आणि धर्म याचा प्रचार सुरू केला होता. त्यातही तिकीट वाटपात जमिनीवरच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. काँग्रेस सारख्या पक्षातील उमेदवारही आयात करण्यात आले. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला भाजपमधील हा अन्याय सहन झाला नाही.

एकनिष्ठ कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाणावर बंडखोर म्हणून उभे होते. त्याचा फटका ही भाजपला बसला. यात भर म्हणून महायुतीत शिवसेना शिंदे गटाशी फारकत घेतल्यानंतर युवा स्वाभिमान सोबतची युतीही तुटली. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यापेक्षा युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार केला. एकूणच सुरुवातीपासूनच ही निवडणूक आणि त्याचे निकाल भाजपच्या विरोधात जात असल्याचे स्पष्ट दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT