

Mahayuti Split Amravati
अमरावती : अमरावती महापालिकेत नामांकन दाखल करण्याच्या ऐन शेवटच्या दिवशी महायुतीतील भाजप शिवसेना आणि युवा स्वाभिमान यांच्यातील युती तुटली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने 71 जागांवर स्वतंत्र उमेदवार दिले असून भाजप 67 जागांवर लढणार आहे. तर युवा स्वाभिमान पक्षाने 41 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भाजपने मुस्लिम बहुल भागात उमेदवार दिलेले नाहीत, हे विशेष. राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र सर्वच 87 जागांवर आपले उमेदवार लढवत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या निवडणुकीत एकत्र आले आहेत. काँग्रेस तब्बल 75 जागांवर लढत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात काही जागांवरच आघाडी आहे. ठाकरे गटाने 45 उमेदवार जाहीर केले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 25 उमेदवार घोषित केले आहेत. महाविकास आघाडी घटक पक्षासोबत समन्वय करून निवडणुकीत प्रभाग व जागा निहाय निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसचे माजी डॉ. सुनील देशमुख यांनी सांगितले.
यासह इतर पक्षांमध्ये वंचित व युनायटेड फोरम यांनी एकत्र येत 55 उमेदवार दिले आहे. बहुजन समाज पक्षाने देखील आपले 30 उमेदवार जाहीर केले आहे. यासह एमआयएम 28 आणि आम आदमी पार्टी 9, मुस्लिम लीग दोन तर समाजवादी पार्टी 7 जागांवर लढत आहे. आज 31 डिसेंबर रोजी नामांकनाची छाननी होऊन 2 जानेवारीपर्यंत निवडणुकीतून कोण माघार घेतो, यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिकेच्या 22 प्रभागातील एकूण 87 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तब्बल 1021 उमेदवार यावेळेस निवडणूक रिंगणात आहे. मागील निवडणुकीत 45 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होऊन 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.