Amravati Municipal Corporation
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी गुरुवारी (दि.२२) आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या १७ व्या महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तास्थापनासाठी विविध पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ८७ सदस्यीय महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी व महापौर निवडणूक जिंकण्यासाठी किमान ४४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे.
निवडणूक निकालानुसार भाजपने सर्वाधिक २५ जागांवर विजय मिळवला आहे. युवा स्वाभिमान पक्ष १५, काँग्रेस १५, एमआयएम १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ११, शिवसेना (शिंदे गट) ३, बसप ३, शिवसेना (ठाकरे गट) २ आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा मिळाली आहे. स्पष्ट बहुमत नसले तरी भाजप, युवा स्वाभिमान पक्ष आणि मित्रपक्षांची सत्ता स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने पुढाकार घेतला असून, महायुतीतील मित्रपक्ष युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनीही भाजपचाच महापौर होईल, असे जाहीर वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपमधील नगरसेवकांमध्ये महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.
अमरावती महापालिकेचा इतिहास पाहता, १० मार्च १९९२ रोजी डॉ. देवीसिंह शेखावत हे पहिले महापौर होते. १९९२ ते ८ मार्च २०२२ या कालावधीत १६ महापौरांनी पद भूषविले आहे. ९ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होती.
आतापर्यंत डॉ. देवीसिंह शेखावत, प्रभाकर सव्वालाखे, गोविंद अग्रवाल, विद्या देशपांडे, किरण महल्ले, प्रवीण काशीकर, नितीन वानखडे, विलास इंगोले, दीपाली गवळी, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे, अॅड. किशोर शेळके, वंदना कंगाले, चरणजीत कौर नंदा, संजय नरवणे आणि चेतन गावंडे यांनी महापौरपद भूषविले आहे. आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण झाल्याने अमरावतीच्या १७ व्या महापौरपदी कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.