

Amravati Friend Kills Friend Murder Case
अमरावती : दारूच्या नशेमध्ये मित्रानेच स्वयंपाक बनवण्यावरून झालेल्या वादात मित्राची राफ्टरने हल्ला करून हत्या केली. ही घटना परतवाडा पोलीस ठाण्यातंर्गत अष्टमासिद्धी शेतशिवारात बुधवारी (दि.२१) उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भोंदू ब्रिजलाल कवडे (वय ३०, काजळडोह, चिखलदरा) याला ताब्यात घेतले आहे, तर वीरू शिवकली मरसकोल्हे (वय ३०, काजलडोह चिखलदरा) असे मृतकाचे नाव आहे.
माहितीनुसार अचलपूर येथील बुंदेलपुरातील रहिवासी पंकज प्रभाकर वानखडे (वय ३०) यांचे थ्रेशर चे काम आहे. अष्टमासिद्धीमध्ये इकबाल यांच्या शेतात पिकांची कापणी सुरू आहे. यामुळे त्यांनी थ्रेशर वर काम करण्यासाठी काजलडोह वरून मृतक वीरू मरसकोल्हे व आरोपी भोंदू कवडे यांना बोलविले होते. मंगळवारी सायंकाळ पर्यंत त्यांनी इकबाल यांच्या शेतात काम केले आणि रात्रीच्या सुमारास पांदन मार्गावरील गोपाल लुल्ला यांच्या शेतात दोघे स्वयंपाक करत होते.
यावेळी त्यांनी दारू पार्टी पण केली. स्वयंपाक करत असताना वीरू ने भोंदूला म्हटले की तू चांगले जेवण बनवत नाही. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वीरूने त्याला शिवीगाळ केली. यामुळे संतापलेल्या भोंदूने चुलीजवळ ठेवलेला राफ्टर उचलून वीरूच्या डोक्यावर मारला. यामध्ये तो जखमी झाला. त्याच्या डोक्यातून रक्त निघत होते. हे पाहून भोंदू ने त्याच्या डोक्यावर हळद लावून दिली.
यानंतर दोघे झोपून गेले. बुधवारी सकाळी जेव्हा भोंदू उठला तेव्हा त्याने विरुला आवाज दिला. मात्र, तो उठला नाही. यामुळे तो घाबरला आणि त्याने धावत जाऊन आपले मालक पंकज वानखडे यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हे ऐकून वानखडे यांच्या पाया खालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला. आरोपी भोंदू कवडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास परतवाडा पोलिस करीत आहेत.