अमरावती : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात उघडकीस आलेल्या बिबट्याची शिकार आणि त्याच्या अवयवांच्या अवैध व्यापार प्रकरणी फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीला वनविभागाने बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश शेषराव जाधव (रा. कानडी, ता. म्हातूरजीपूर, सध्या रा. चिरोडी) असे या तिसऱ्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरार आरोपी मंगेश जाधवचा वनविभाग गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होता. चांदूर रेल्वे परिसरातून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. याप्रकरणी याआधीच पूरण प्रल्हाद राठोड (रा. चिरोडी) आणि प्रकाश किसन जाधव (रा. पाथरगाव) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून बिबट्याची हाडे, नखे, मिशा तसेच चंदन लाकूड जप्त करण्यात आले होते.
वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (मुंबई) यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने ही कारवाई केली होती. या प्रकरणात तिन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ (सुधारणा २०२२), भारतीय वन अधिनियम, महाराष्ट्र वन नियम या विविध कायद्यांनुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध शिकार, वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी, चिन्हे तयार करणे तसेच चंदन वृक्षांची अवैध तोड व वाहतूक याबाबत वनविभाग सखोल तपास करत आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.