Amravati Hospital Fire Video: महाराष्ट्रातील अमरावती येथे सोमवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सरकारी महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) अचानक आग लागली. या दुर्घटनेत उपचारासाठी दाखल असलेल्या तीन नवजात बाळांचा मृत्यू झाला असून, सहा बाळे जखमी झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 24 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजता रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशु विभागात आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये अचानक बिघाड किंवा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे.
रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात बाळांच्या उपचारासाठी तीन स्वतंत्र खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत 13 बाळांवर उपचार करण्याची व्यवस्था असून, एकूण 39 बाळांना येथे दाखल करण्याची क्षमता आहे.
ज्या विभागात आग लागली, त्या वेळी NICUमध्ये अनेक नवजात बाळांवर उपचार सुरू होते. आग लागताच डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत बाळांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
या आगीत तीन नवजात बाळांचा मृत्यू झाला. तर सहा बाळे जखमी झाली असून, काहींचे हात-पाय भाजल्याची माहिती समोर आली आहे. जखमी बाळांना तातडीने जवळच्या सरकारी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी आग लागल्यानंतर अनेक बाळांना व्हेंटिलेटरमधून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
या दुर्घटनेनंतर पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने तपास सुरू केला आहे. व्हेंटिलेटरमध्ये नेमका स्फोट झाला का, तांत्रिक बिघाडामुळे आग लागली का, याचा शोध घेतला जात आहे.
तसेच रुग्णालयातील उपकरणांची नियमित तपासणी होत होती का, अग्निसुरक्षा यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत होती का आणि आग लागल्यानंतर आवश्यक सुरक्षा व्यवस्था सक्रिय झाली का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या रुग्णालयातील विशेष नवजात शिशु उपचार विभागात लवकर जन्मलेल्या, कमी वजनाच्या आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बाळांवर उपचार केले जातात. हा विभाग सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, इतक्या संवेदनशील विभागात आग लागल्यानंतर सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेचे कारण काय आहे आणि यात कोणाचा निष्काळजीपणा आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, तीन निष्पाप नवजात बाळांच्या मृत्यूने अमरावतीत शोककळा पसरली असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.