अमरावती: 'हीट अँड रन'प्रकरणी संशयिताल अटक  
अमरावती

अमरावती: ‘हीट अँड रन’ प्रकरणी २७ दिवसानंतर संशयित शिक्षकाला अटक

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा:  गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत संमतीनगर मध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना २७ दिवसानंतर अटक करण्यात अमरावती पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपींना दर्यापूर तालुक्यातील येवदा जवळ असलेल्या नांदरून गावातून गुरूवारी (दि.३०) अटक करण्यात आली आहे.

'हीट अँड रन' प्रकरण कसे घडलं?

  • संमतीनगरमध्ये भीमसेन वाहने यांचा ३ मेरोजी एका कारच्या धडकेत मृत्यू
  • पांढऱ्या रंगाच्या कारमधील आरोपी अपघातानंतर घटनास्थळावरून पसार
  • कारचा चालक प्रशांत वाघाडे  शिक्षक असल्याचे निष्पन्न
  • आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांवर सातत्याने दबाव
  • २७ दिवसानंतर कारचा शोध घेऊन आरोपी गजाआड

गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत संमतीनगरमध्ये भीमसेन वाहने यांचा ३ मे रोजी एका टाटा बोल्ट कारने धडक दिल्याने अपघात झाला होता. पांढऱ्या रंगाच्या  कारमधील आरोपी अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाले होते. कारमध्ये कारचालक शिक्षकासह अन्य दोघेजण बसलेले होते. त्यामध्ये एका अल्पवयीनाचा देखील समावेश होता. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळा लगतच्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता.

उपचारादरम्यान भीमसेन वाहने यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही घटनेला महिना उलटल्यानंतरही या प्रकरणात पोलीस आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वतः या प्रकरणाची धुरा आपल्याकडे घेत गुन्हे शाखेसह पोलिसांच्या विविध टीम तयार केल्या होत्या. त्यानंतर अखेर चार ते पाच दिवसांतच संशयित आरोपी गजाआड झाले आहेत. या कारचा चालक आरोपी प्रशांत वाघाडे (वय ३९) असून तो शाळेत शिक्षक असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीसह अन्य एकाला अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या टाटा बोल्ट कारसह दर्यापूर तालुक्यातील नांदूरन गावातून ताब्यात घेण्यात आले.

भीमसेन वाहने यांना धडक दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल न करता आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले होते. एक सीसीटीव्ही फुटेज वगळता पोलिसांकडे दुसरा कुठलाही पुरावा नव्हता. पोलिसांसाठी हे प्रकरण एक प्रकारे आव्हान होते. अमरावती शहर पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यांसाठी वीस हजारांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. गुन्हे शाखेने तांत्रिक पद्धतीने तपास करून अमरावती आरटीओमध्ये नोंदणी असलेल्या १२७ टाटा इंडिका बोल्ट वाहनांची यादी मिळविली. आणि सात वेगवेगळ्या पथकांद्वारे त्यांची तपासणी केली. दरम्यान, यात आरोपी प्रशांत वाघाडे याच्या वाहनानेच भीमसेन वाहने यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह अन्य एकाला अटक केली आहे.

विवाह समारंभासाठी आला होता आरोपी

तीन मे रोजी आरोपी प्रशांत वाघाडे आपल्या नातेवाईकांसह अमरावती येथे आयोजित एका विवाह समारंभासाठी टाटा बोल्ट कार (एमएच २७ बीई ३५०९) ने आला होता. दरम्यान, तो आपल्या भावासाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो, म्हणून अन्य दोघांना घेऊन तो संमती नगरातून जात होता. यादरम्यानच त्याने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून भीमसेन वाहने यांच्या दुचाकीला धडक दिली होती. अपघातानंतर जखमीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी आरोपी इतर दोघांसह तेथून पळून गेला होता.

पोलिसांवर सातत्याने दबाव

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भीमसेन वाहने यांच्या कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांवर सातत्याने दबाव आणला होता. निवेदन, तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अखेर शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली. त्यापैकी गुन्हे शाखेच्या पथकाला कारचा शोध घेऊन आरोपींना गजाआड करण्यात यश आले. या प्रकरणात एकूण तीन आरोपींचा समावेश आहे. त्यापैकी एक अल्पवयीन आहे. पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर, सागर पाटील, गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव ( गुन्हे शाखा युनिट १) यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, प्रकाश झोपाटे, पोलीस अंमलदार राजू आपा बाहनकर, फिरोज खान, सतिश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सुरज चव्हाण, निखील गेडाम आदींनी केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT