अमरावती; पुढारी वृत्तसेवा : कोळसा घेऊन जाणारा ट्रक आग लागल्यामुळे जळून खाक झाल्याची घटना नागपूर- अमरावती महामार्गावर घडली आहे. जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून जवळच असलेल्या दास टेकडी मार्गावर शनिवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास चाळीस टन कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. भर उन्हात कोळसा घेऊन जाणारा हा ट्रक आगीमध्ये जळून खाक झाला.
प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक एम एच 34 बी झेड 43 25 हा ट्रक कंटेनर चंद्रपूर येथील कोळशाच्या खाणीतून 40 टन कोळसा घेऊन अमरावतीतील डवरगाव मार्गावर असणाऱ्या रतन इंडिया पावर प्लांटकडे जात होता. दरम्यान गुरुकुंज मोझरी नजीक दास टेकडी जवळ ट्रकने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला.
बघता बघता काही क्षणातच संपूर्ण ट्रक आगीच्या हवाली झाला होता. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. ट्रक चालकाचे नाव कलाम अहमद (३२, उत्तर प्रदेश) आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिवसा, चांदुर रेल्वे आणि अमरावती येथून अग्निशमन दलाच्या बंबाना आग विझवण्यासाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र तेव्हापर्यंत ट्रक अर्ध्यापेक्षा जास्त जळून खाक झाला होता.
विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. अमरावतीत 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे अति उष्णतेमुळे ट्रकच्या चाकांनी घर्षणाने ही आग लागली असावी. ट्रकमध्ये कोळसा असल्यामुळे आगीने आणखीनच रौद्ररूप धारण केले, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान तिवसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.