अमरावती

Amravati crime : तरुणीची भरदुपारी चाकूने भोसकून हत्या; एकतर्फी प्रेमाचा संशय

पोलीस सध्या घटनास्थळाचा पंचनामा करत असून फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : शहरातील रवीनगर परिसरात आज (दि.३) दुपारी १ वाजताच्या सुमारास बियाणी सायन्स कॉलेजमध्ये B.Sc. प्रथम वर्षात शिकणाऱ्या शर्वरी गणेश हाडके (रा. अंबाविहार परिसर) या १७ वर्षीय तरुणीची भरदुपारी चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी हा मूर्तिजापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी कॉलेजवरून घरी परतत असताना आरोपीने शर्वरीचा रस्ता अडवला आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. घटना घडत असताना ऑटो चालक विनय काळे आणि प्रवासी राहुल इंगोले यांनी अत्यंत प्रसंगावधान दाखवत आरोपीच्या तावडीतून तरुणीला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शर्वरीवर चाकूचे ८ गंभीर वार झाले होते. गर्दी जमल्याचे पाहून आरोपीने आपल्या होंडा शाईन दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला.

विनय काले आणि राहुल इंगोले यांनी तातडीने शर्वरीला ऑटोमधून रिम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शर्वरीची प्राणज्योत मालवली. तेथील डॉ. वानखडे यांनी तात्काळ राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृत शर्वरी ही अत्यंत सामान्य कुटुंबातील असून तिचे वडील गणेश हाडके होर्डिंग लावण्याचे काम करतात. तिच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. एकुलत्या एका मुलीच्या हत्येने हाडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नागरिकांमध्ये संताप

घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून रिम्स रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस सध्या घटनास्थळाचा पंचनामा करत असून फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT