अमरावती : तपोवन परिसरात टेकडीमागील जंगलातून वाहणाऱ्या नाल्यामध्ये एका १८ ते २२ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह मंगळवारी (दि.२) आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी तरुणीची हत्या करून तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मंगळवारी तपोवन परिसरातील जंगलात एक गुराखी गुरे चरण्यासाठी गेला असता, त्याला नाल्यामध्ये एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत दिसला. तरुणीचे डोके खड्ड्यात आणि पाय वरच्या बाजूला होते. हा धक्कादायक प्रकार पाहून घाबरलेल्या गुराख्याने तातडीने गाडगे नगर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गाडगे नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, मृतदेहाजवळ एक लोखंडी रॉड आढळून आला. या लोखंडी रॉडने तरुणीच्या डोक्यावर जबर प्रहार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल-प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त श्याम घुगे, गाडगे नगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. पोलीस आयुक्तांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करून तपासाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक दिशा-निर्देश दिले.
तपासात मदत व्हावी म्हणून फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही (डॉग स्क्वॉड) पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. मृत तरुणीची ओळख पटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, शहरातील व परिसरातील बेपत्ता मुलींची माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, गाडगे नगर पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.