Abuse Case  Pudhari
अमरावती

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: दुसरा आरोपी उजेर खानवर गुन्हा दाखल

१५ वर्षीय पीडितेचा जबाब नोंदविला, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : परतवाडा येथील बहुचर्चित लैंगिक शोषण प्रकरणात आता नवीन वळण आले असून, पोलिसांनी तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे. या प्रकरणात आता दुसरा आरोपी उजेर खान इकबाल खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून, मुख्य आरोपी अयान अहमदच्या अडचणीतही मोठी वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उजेर खान हा एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या सतत संपर्कात होता. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला अनेकदा समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. अखेर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी उजेर खानविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त; फॉरेन्सिक तपासणी सुरू

या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आणखी ६ मोबाईल, १ लॅपटॉप, १ टॅब आणि १ हार्ड डिस्क जप्त केली आहे. यापूर्वीही पाच मोबाईल जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेली सर्व उपकरणे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहेत. या उपकरणांमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू असून, फॉरेन्सिक रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्य आरोपी अयान अहमदच्या अडचणीत वाढ

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद (वय १९, परतवाडा) याच्याविरुद्धचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. एका १५ वर्षीय पीडितेचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. हा जबाब या प्रकरणाच्या मुख्य तपासाशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होण्यास मदत होईल. नागपूर येथील पीडितेचा जबाब अत्यंत गोपनीय रीतीने महिला पोलीस अधिकारी आणि महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका गुप्त ठिकाणी नोंदवण्यात आला आहे. तपास यंत्रणा आता फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रतीक्षेत असून, या अहवालानंतर या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT