

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरात गाजत असलेल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला कर्मचारी लैंगिक शोषण प्रकरणात आता संबंधित कंपनी व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेतले असून, या प्रकरणाशी संबंधित सर्व संशयित कर्मचाऱ्यांना पूर्ण चौकशी होईपर्यंत निलंबित केल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच या प्रकरणाची अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती कंपनी प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे. सदर कंपनीने याबाबत निवेदन जाहीर केले आहे. यात म्हटले की, आतापर्यंतच्या कंपनीच्या वाटचालीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलमाविरुद्ध दीर्घकालीन शून्य सहनशीलता धोरण अवलंबिले आहे.
आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणाच्या सर्वोच्च मानकांसाठी प्राधान्य देतो. नाशिकमधील कथित प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तत्काळ कारवाई केली असून, अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. तपासाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आम्ही पोलिस यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहोत.
तपासाला अधिक गती मिळणार
आयटी कंपनीकडील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची व्याप्ती बघता विशेष पोलिस तपास पथकाची स्थापना करून त्यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. त्यानुसार सूक्ष्म रीतीने या संदर्भात तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सदर कंपनीने याबाबत तपासात जे जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करण्याबाबत निवेदन जाहीर केल्याने तपासाला अधिक गती मिळणार आहे.