Nashik workplace abuse scandal | महिला एचआरला तीन दिवसांची कोठडी

बहुराष्ट्रीय कंपनी प्रकरण : ६ संशयितांना न्यायालयीन कोठडी, दुसऱ्या गुन्ह्यात ताबा
Nashik workplace abuse scandal | महिला एचआरला तीन दिवसांची कोठडी
Published on
Updated on

नाशिक : शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार तसेच धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयितांना शुक्रवारी (दि. १०) न्यायालयात हजर केले असता, कंपनीच्या मनुष्यबळ विभागातील महिला एचआरला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ६ संशयितांना पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांना अन्य गुन्ह्यात वर्ग करण्याच्या प्रक्रिया एसआयटीने सुरू केली आहे.

बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात १ व मुंबई नाका पोलीस ठाण्यात ८ असे ९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. ८ महिला व १ पुरुष फिर्यादी आहे. आठपैकी दोन महिला विवाहित, तर ६ तरुणी अविवाहित आहेत. ९ पैकी एका गुन्ह्यात लैंगिक अत्याचारासह धर्मांतराचा प्रयत्न झाला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात तरुणीचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, शाहरूख कुरेशी, तौसीफ अत्तर, दानिश शेख या ६ जणांना अटक करण्यात आली. निदा खान ही महिला अद्यापही फरार आहे. कंपनीतील एचआर अश्विनी अशोक चैनानी (५१, रा. लुलानगर, पुणे) हिला पुणे येथून एसआयटीने गुरुवारी (दि. ९) ताब्यात घेतले होते. या सर्व संशयित आरोपींना शुक्रवारी (दि. ९) न्यायाधीश आर. सी. नरवाडिया यांच्या न्यायालयात हजर केले असता, तिसऱ्या गुन्ह्यात ६ संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एचआर अश्विनी चैनानी हिला पहिल्या गुन्ह्यात १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एसआयटीने पुढील गुन्ह्यात ६ आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात ट्रान्सफर वॉरंट सादर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, अश्विनी चैनानी हिच्याकडून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

असा झाला युक्तिवाद

बचाव पक्षातर्फे अॅड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, मागील पोलीस कोठडीपासून आतापर्यंत तपास यंत्रणेकडे कोणतीही प्रगती दिसत नाही. मुळातच सगळे आरोप हे एक, दोन वर्षे जुने आहेत. ते तोंडी आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना कोठडीत घेणे गरजेचे नाही. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले जाते. मुळात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, तपासात सहकार्य करणे म्हणजे आरोपींनी गुन्हा कबूल करणे होत नाही. सरकारी पक्षातर्फे अॅड. अनिकेत आव्हाड, अॅड. किरण बेंडभर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, अश्विनी चैनानी हिने महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घेतली असती, तर प्रकरणाची व्याप्ती वाढली नसती. चैनानी हिचा या प्रकरणात सहभाग आहे काय, याचा तपास करण्याची गरज आहे. त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची असल्याचे सांगितले.

पोलिसांचे आवाहन

एसआयटी प्रमुख सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी न्यायालयीन कोठडी झालेल्या सहाही संशयित आरोपींचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात ट्रान्सफर वॉरंट सादर करत, त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यातर्फे पीडितांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहनही केले. एखाद्याला या प्रकरणाची माहिती द्यायची असेल, तर त्यांनीही पुढे यावे. त्यांचे नाव गुपित ठेवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news