अमरावती : शहरात घरफोडीच्या घटनांचा तपास करत असताना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अट्टल घरफोडी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून तब्बल १९ लाख ६६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रज्वल गणेश बनसोड (वय २५, रा. मूर्तिजापूर, जि. अकोला, ह.मु. पाचबंगला, जुनी वस्ती, बडनेरा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
तपासादरम्यान शहरातील एकूण सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सामरा नगर, येथील प्रेमानंद रत्नाकर शिंदे यांनी राजापेठ पोलस ठाण्यात २७ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती कि, ते २५ जुलै रोजी कुटुंबासह चिखलदरा येथे गेले होते. दुसर्या दिवशी घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याचे ऑटोमॅटिक लॉक तुटलेले दिसले. घरात पाहणी केली असता लाकडी कपाटातील चांदीचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरी केल्या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्याचबरोबर गुप्त बातमीदारांना सक्रिय करण्यात आले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला. तपासा दरम्यान हा गुन्हा बडनेरा परिसरातील एका व्यक्तीने केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने २० ऑगस्ट रोजी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी प्रज्वल गणेश बनसोड हा मूळचा मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील असून मागील दोन वर्षांपासून बडनेरा परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. चौकशीत त्याने शहरातील विविध भागात साथीदाराच्या मदतीने आणखी सहा ते सात घरफोड्या केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पुढे नेला.
या कारवाईत पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच धातूच्या लगडी, रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली अॅक्टीवा मोपेड असा एकूण १९ लाख ६६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ९६ ग्रॅम सोन्याची लगड, १३ ग्रॅम सोन्याची लगड, १५ ग्रॅम सोन्याची लगड तसेच विविध प्रमाणातील चांदीचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेली एम २७ बीएम ५१८१ क्रमांकाची अॅक्टीवा मोपेड, तसेच घरफोडीत चोरी केलेली ३ हजार ३०० रुपयांची रोकडही जप्त केली आहे.फरार आरोपी निखिल बाळासाहेब तराळे,( रा. गणुवाडी) याचा शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे राजापेठ, बडनेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शाम घुगे, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनावणे, सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे आणि सहायक पोलीस आयुक्त नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी केली. तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनीही तपासात सहकार्य केले.