Amravati crime news 
अमरावती

Retired judge house theft : सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या घरी चोरी करणारी टोळी गजाआड

Amravati crime news: अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : स्थानिक गुन्हे शाखा आणि परतवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बंद घरांची रेकी करून कुलूप तोडून चोरी करणार्‍या सराईत आंतर-जिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल असा एकूण ११ लाख २२ हजार ६८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परतवाडा येथील सिव्हिल लाईन परिसरातील रहिवासी व सेवानिवृत्त्त न्यायाधीश मोहम्मद सादीक मोहम्मद उमर (वय ६५ वर्षे ) यांनी १८ ऑगस्ट रोजी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारी नुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर बंद असताना कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातून ५ तोळ्यांचे सोन्याचे नेकलेस, २ तोळ्यांच्या बांगड्या, २० तोळ्यांच्या चांदीच्या पैंजण आणि १ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. 

या प्रकरणात पोलिसांनी तपास करून आरोपी श्रीरंग चंद्रचूड रत्नपारखी (वय ३०, रा. छांगानी नगर),प्रतीक संतोष वारसे(वय ३१, रा. पंचशील नगर),आकाश उर्फ कोबरा विनोद कंगाले (वय २८, रा. आदिवासी नगर),साहिल उर्फ बंटी बाळकृष्ण वाकपांजर (वय २३, रा. शिलोरी), अक्षय बाळू जुनघरे (वय ३१, रा. नवसारी) व आकाश उर्फ पख्या सुरेश घुर्वे (रा. अमरावती) यांना अटक केली आहे. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.   तपास पथकाने पारंपरिक तपासासोबतच तांत्रिक तपासावर भर दिला. सुमारे ८० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच २१० कॉल डिटेल रेकॉर्ड्सचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून प्रथम ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर टोळीतील इतर २ साथीदारांनाही अटक करण्यात आली.

श्रीरंग चंद्रचूड रत्नपारखी,प्रतीक संतोष वारसे,आकाश उर्फ कोबरा विनोद कंगाले,साहिल उर्फ बंटी बाळकृष्ण वाकपाजर, अक्षय बाळू जुनघरे,आकाश उर्फ पख्या सुरेश घुर्वे यांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून ६७.०२ ग्रॅम दागिने, ७६ हजार ७०० रुपये रोख, ३ वाहने आणि ५ मोबाईल हँडसेट असा एकूण ११ लाख २२ हजार ६८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासात ही टोळी बंद असलेल्या घरांची रेकी करून संधी साधून चोरीच्या घटना घडवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि एसडीपीओ माधव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय अशोक लांडे, एपीआय संतोष गुर्जर, पीएसआय सागर हटवार, पीएसआय अजय आक्रे, परतवाडा ठाण्याचे ठाणेदार अजय आकरे यांच्यासह एलसीबी, परतवाडा पोलीस ठाणे आणि सायबर सेलच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT