Amravati crime news | कपिलवस्तु नगरात तरुणाचा खून 

पाच जण पोलिसांच्या ताब्यात
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

अमरावती : शहरातील कपिलवस्तु नगर परिसरात जुन्या वैमनस्यातून २० वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.११) मध्यरात्री घडली. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

संतोष उर्फ संत्या राजू बन (वय २०, रा. कपिलवस्तु नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. साहिल मावसकर (वय २०) आणि प्रतीक चव्हाण (वय २०, दोघे रा. जयश्रीराम नगर) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि आरोपी यांच्यात काही महिन्यांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्या वादाचे रूपांतर द्वेषात होऊन आरोपींनी सूड उगवण्याची संधी साधली. शनिवारी रात्री सुमारे १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलींवरून आलेल्या पाच ते सहा जणांनी संतोषवर अचानक हल्ला चढवला. चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक आणि संतोषचा भाऊ धावून आले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.

घटनास्थळी आरोपीनी एक वाहन सोडून दिल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा मिळाला. जखमी अवस्थेत संतोषला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या शरीरावर तीन ते चार खोल जखमा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही रुग्णालयात भेट देत तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी जलद कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news