

अमरावती : नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान निर्माण झालेल्या तणावातून अंजनगाव सुर्जी शहरात रविवारी (दि.२२) दुपारी थरारक घटना घडली. विजय–पराजयाच्या चर्चेतून सुरू झालेल्या वादाचे रुपांतर हिंसाचारात होऊन एका ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी १२ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
या घटनेत मोहम्मद जाकीर शेख नजीर (वय ६०, रा. कुरेशी नगर) यांचा मृत्यू झाला. ते गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १० मधील मतमोजणी सुरू असताना निकालावरून दोन राजकीय गटांमध्ये तणाव निर्माण झाला. शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये विजयाच्या जल्लोषातून वाद पेटला. या दरम्यान मृतक आणि त्यांचा मुलगा मोहम्मद अखलाल हे शासकीय रुग्णालयाकडे जात असताना काही जणांनी त्यांना अडवून शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वाद शांत करण्याचा प्रयत्न करत असताना मृतकाला जोरात ढकलण्यात आले. ते जमिनीवर कोसळल्यानंतरही त्यांच्यावर मारहाण झाल्याचे सांगण्यात आले आहे. बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर शहरातील वातावरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. रात्री उशिरापर्यंत मृतकाच्या नातेवाइकांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
अखेर पोलिसांनी १२ संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. या प्रकरणी एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद धाडसे व त्यांचे पथक करीत आहे.