अमरावती : महापालिका अंतर्गत श्वान नियंत्रण व लसीकरणाच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती १ लाख रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविणार्या अमरावती महानगरपालिकेच्या प्रभारी पशुवैद्यकीय अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (दि.१६) अखेर ताब्यात घेतले आहे. सचिन छगनअप्पा बोंद्रे (वय ४७ वर्ष, रा. कलोती नगर, अमरावती, मूळ रा. चिखली, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या संस्थेने अमरावती महानगरपालिका अंतर्गत श्वान उत्पत्ती, नियंत्रण, निर्बीजीकरण आणि लसीकरण कार्यक्रमाचे कंत्राट पूर्ण केले होते. या केलेल्या विविध कामांची एकूण ४७ लाख रुपयांची देयके मंजूर करायची होती. ही बिलं टप्प्याटप्प्याने मंजूर करून देण्यासाठी आरोपी सचिन बोंद्रे याने तक्रारदाराकडे २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला टप्पा म्हणून २ लाख रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणी तक्रारदाराने ८ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती येथे रीतसर तक्रार नोंदवली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने १० जून २०२६ रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपी सचिन बोंद्रे याने पहिल्या टप्प्यातील २ लाख रुपयांच्या मागणीवर तडजोड करत १ लाख रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानंतर ११ जून २०२६ रोजी लाचेचा सापळा रचण्यात आला होता. यावेळी आरोपी बोंद्रे हा आपले शासकीय वाहन न वापरता तक्रारदाराच्या दुचाकीवर मागे बसून मनपा कार्यालयातून बाहेर पडला. दोघेही पंचवटी चौकाकडे जात असताना, रस्त्यातच सचिन बोंद्रे याला काहीतरी संशय आला. संशय आल्यामुळे त्याने लाचेची रक्कम न स्वीकारता, रस्त्यातच दुचाकीवरून खाली उतरून आपले शासकीय वाहन बोलावले आणि त्यात बसून तो निघून गेला.
अखेर घरातून ठोकल्या बेड्या
आरोपीला संशय आल्याने तो आता लाचेची रक्कम स्वीकारणार नसल्याची खात्री तक्रारदाराला झाली. त्यामुळे तक्रारदाराने दिलेल्या पुरवणी निवेदनावरून एसीबीच्या पथकाने थेट कारवाई करत आरोपी सचिन बोंद्रे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर , अपर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.