Amravati Bribe Case : ७० हजारांची लाच घेणारा कृषी अधिकारी जाळ्यात! खाजगी गाडीत पैशांचे पाकीट घेताना ‘ACB’ची झडप

खत नमुन्यांची कारवाई टाळण्यासाठी मागितली होती लाच
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

अमरावती : कृषी केंद्रातील खत नमुन्यांवरील कारवाई टाळण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे कृषी विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपीने ही लाचेची रक्कम स्वतःच्या खाजगी वाहनात स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

असा रचला सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कृषी केंद्रातून घेण्यात आलेल्या खत नमुन्यांवर पुढील कायदेशीर कारवाई न करण्यासाठी, तसेच भविष्यात अन्य कंपन्यांच्या खतांचे नमुने न घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने पैशांची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने गोपनीय पडताळणी केली.

या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आली. आधीच घेतलेले दोन खत नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी न पाठविण्याच्या बदल्यात प्रत्येकी २० हजार रुपये आणि आगामी काळात इतर दोन कंपन्यांच्या खतांचे नमुने न घेण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये, अशी एकूण ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची मागणी स्पष्ट होताच एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला.

खाजगी वाहनात स्वीकारली लाच

शुक्रवारी आरोपी विराग आनंदराव देशमुख (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक) यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या खाजगी वाहनात ७० हजार रुपयांची लाच स्वीकारली. पैसे हातात पडताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

एसीबीचे पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे तसेच एसीबीच्या पथकातील अंमलदारांनी हा सापळा यशस्वी केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास, नागरिकांनी त्याला बळी न पडता त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. अमरावती परिक्षेत्रातील (अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा) नागरिकांच्या तक्रारींवर अत्यंत गोपनीयतेने आणि तत्काळ कारवाई केली जाईल, असे आवाहन एसीबीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news