अमरावती : कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अमरावतीत उघडकीस आली. ही दुर्दैवी घटना जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात चमक बुद्रुक येथे शनिवारी (दि.१४) सायंकाळी घडली. या घटनेने गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. सुमती लक्ष्मण कासदेकर (वय ३८), विकी लक्ष्मण कासदेकर (वय ४ वर्ष), श्वेता लक्ष्मण कासदेकर (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथील लक्ष्मण कासदेकर हे पत्नी सुमती आणि मुलांसह गेल्या २५ वर्षापासून या गावात उदरनिर्वाहाच्या उद्देशाने आले. कालांतराने ते याच ठिकाणी स्थायिक झाले. पत्नी सुमती (वय ३८) हिच्यासह ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा मुलगा विकी याने घरात सुरू असलेल्या कुलरला स्पर्श केला. कुलरमध्ये अगोदरच विद्युत प्रवाह संचारलेला होता, याची थोडीही कल्पना या परिवाराला नव्हती. विकीला कुलरचा शॉक लागताच तो ओरडल्याने त्याला सोडवण्यासाठी त्याची आई सुमती सुद्धा गेली. तिलादेखील शॉक लागल्याने ती बेशुद्ध पडली.
आई बेशुद्ध पडल्याचे पाहून मुलगी श्वेता आईला जावून बिलगली. यात सुमती यांच्यासह श्वेता आणि विकी या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळानंतर लक्ष्मण कासदेकर हे शेतातील काम आटोपून घरी आले असता पत्नी व दोन मुलांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा त्यांच्या निदर्शनास आले. ही हृदयद्रावक घटना बघताच त्यांनी टाहो फोडल्याने गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सरमसपुरा ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करीत तिन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. घटनेच्या वेळी घटनास्थळी गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबास मदत देण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.