

गडचिरोली : मद्यप्राशन करुन भांडण करणाऱ्या सासऱ्याला जावयाने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी(दि.१४) रात्री अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली. रमेश पोचम दुर्गे(वय ५५) असे मृत सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी जावई चंद्रशेखर हिरालाल पवार (वय २५) याला अटक केली करण्यात आली. तो कनार्टकातील गुलबर्गा जिल्ह्यातील चितापूर तांडा येथील रहिवासी आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मृत रमेश पोचम यांच्या मुलीशी कर्नाटकातील चंद्रशेखर पवार याच्याशी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून ते कर्नाटकात राहायचे. काही दिवसांपूर्वी ते महागाव येथे आले होते. १४ जूनच्या रात्री रमेश पोचम याने मद्यप्राशन करुन जावई चंद्रशेखर पवार याच्याशी तुम्ही येथे कशाला आले? असे म्हणून वाद घातला. यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. चंद्रशेखरने रमेश पोचम यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंद्रशेखरचा राग अनावर झाल्याने तो मारहाण करीतच राहिला. यामुळे रमेश पोचम रस्त्याच्या कडेला पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
रमेश पोचम हा संशयावरुन नेहमी पत्नीशी वाद घालायचा. यापूर्वी त्याने मारहाण केल्याने पत्नी गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी रमेशवर गुन्हाही दाखल झाला होता. आता त्याने जावयाशी वाद घातल्याने जावयाने जबर मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. पोलिस निरीक्षक हर्षल एकरे घटनेचा तपास करीत आहेत.