

जामखेड : अंबड तालुक्यातील रोहिलागड शिवारातील सोलार प्लॅन्ट वर चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यास सुरक्षा रक्षकांनी पकडुन केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार जामखेड व रोहिलागड येथे टाटा कंपनीचा सोलर प्लॅन्ट आहे . त्यातील रोहिलागड येथील ब्लॉक नंबर 16 मधील प्लॅन्टवर रविवार (दि-15) रात्री दोनच्या सुमारास केबल चोरी करण्याच्या प्रयत्न करणार्या चोरट्यास तेथील सुरक्षा रक्षकांनी पकडुन केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यु झाला. (Janlan Crime)
बीड जिल्ह्यातील सिदोड येथील उमाराव देवराव काळे हा आपल्या सहकाऱ्यांसह अंबड तालुक्यातील रोहिलागड शिवारात असलेल्या सोलर प्लॅन्ट वरुन केबल चोरी करत असतांना रात्री सुरक्षा रक्षकांनी पकडला. त्यास लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. घटनेची माहीती अंबड पोलीसांना कळताच पोलीस उपनिरिक्षक भगवान नरोडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरिक्षक संतोष घोडके यांना माहिती देत पहाटेच्या सुमारास आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले, गंभीर जखमी उमाराव यास प्रथम अंबड येथील उपजिल्हा रुग्णालय हलविले माञ प्रकृती चिंताजनक असल्याने जालना येथे रेफर केले. पण गंभीर जख्मी झालेल्या उमारावचा रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यु झाला.
उमाराव या चोरट्यास मारहाण करणार्या जवळपास सात लोकांना अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक भगवान नरोडे, दिपक पाटील, अरुण मुंडे, स्वप्नील भिसे , नागवे यांनी ताब्यात घेतले तर अन्य लोकांच्या शोधार्थ पथक रवाना झालं आहे. या प्रकरणी मयतावर उत्तरीय तपासणी केली जात असून नातेवाईकांनी गर्दी केली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .