अमरावती : पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राज्यभर गाजत असताना अमरावतीतून अशीच घटना समोर आली आहे. पती आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर काम करणाऱ्या (सीएचओ) महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना रविवारी (दि.२५) शहरातील जयभोले कॉलनीत घडली. शुभांगी निलेश तायवाडे (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.
शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर मॅनेजर आहे. तर शुभांगी ही आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहे. शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला. त्यांना एक तीन वर्षाची आणि एक वर्षाची अशा दोन मुली आहे. लग्नानंतर काही दिवसातच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केले होते. या त्रासामुळेच शुभांगीने जीवन संपविले असल्याचा आरोप शुभांगीच्या आई-वडिलांनी केला आहे.
आठ दिवसांपूर्वी आपल्या मुलीला मारहाण करण्यात आली होती. तुमची मुलगी घेऊन जा, मला घटस्फोट द्या, असं जावयाने म्हटल्याचे मृत शुभांगीच्या वडिलांनी सांगितले. आपली मुलगी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असून ती असं करूच शकत नाही, असा दावाही तिच्या वडिलांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गाडगेनगर पोलिस करत आहेत.
दुसरी मुलगी झाल्यापासून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ सुरू केला होता. या सततच्या छळाला कंटाळून शुभांगीने जीवन संपविले, असा आरोपही होत आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन बँक व्यवस्थापक पतीसह पाच जणांविरुद्ध जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. शुभांगी यांचा पती नीलेश तायवाडे (वय ३५), भासरा नितीन (वय ३८), भाचा नयन (वय २५) यांच्यासह सासू व नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी नीलेश तायवाडे, सासू व नणंदेला अटक करण्यात आली.
आपल्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपविले नसून तिच्या पतीनेच तिला फासावर लटकविले आहे, असा देखील आरोप मृत शुभांगीच्या आई-वडिलांनी केला आहे.