

अमरावती : लग्न ठरलेल्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह शेत शिवारातील विहिरीत फेकण्यात आला. ही धक्कादायक घटना गुरूवारी (दि.२२) रात्री अमरावतीतील मोर्शी तालुक्यात घडली. धरमु मलियान उईके (वय २४, रा.पाटनाका ता.आठनेर जि.बैतूल) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी दयाराम वरटी याच्यावर मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मृत धरमू उईके याचे आज (शुक्रवारी) गावातील मुलीसोबत लग्न होणार होते. या मुलीचे आरोपी दयाराम वरटी याच्याशी प्रेम संबंध होते. म्हणून लग्नाच्या आधल्या दिवशी धरमु उईके याचा काटा काढण्याच्या उद्देशाने दयारामने ग्राम पाळा येथून मोर्शीला लग्नासाठी फटाके आणण्याच्या बहाण्याने त्याला मोर्शी येथे दुचाकीवरून आणले. धरमु याला त्याने दारू पाजली व मौजा कवठाळ येथील रमेश ठाकरे यांच्या शेतातील झोपडपट्टीत दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह रमेश ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत फेकला.
मुलगा हरवल्याची तक्रार मृताचे वडील मलियन उईके (वय ६४) यांनी गुरूवारी (दि.२२) पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत दयाराम वराटी याला संशयितरित्या ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आपणच प्रेमप्रकरणातून त्याची गुरूवारी (दि.२२) हत्या केल्याची कबूली त्याने दिली. त्याच्यावर मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी मोर्शी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड ठाणेदार सचिन लुले, सहाय्यक ठाणेदार लक्ष्मण ढेगंरे, जमादार संतोष लहाने, पोलीस कॉन्स्टेबल रोशन तथे, पंकज चौधरी, वैभव घोगरे हे पुढील तपास करीत आहेत.