

अमरावती : ऑटो रिक्षा-कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ऑटोचालक ठार झाला तर महिला व लहान मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी (दि.३०) सायंकाळी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील आराळाजवळ घडली. मोहम्मद शकूर मोहम्मद गपफूर (वय ४५) असे मृताचे नाव आहे.
अमरावती येथील भुरी प्रविण शेख गुड्डी (वय ४०), मोहम्मद शकूर मोहम्मद गपफूर (वय ४५),फातेमा प्रविण शेख गुड्डू (वय ८) हे ऑटो रिक्षा (क्र. एमएच २७/बिडब्ल्यू ३०७३) ने टाकळीवरुन अमरावतीकडे जात होते. दरम्यान विरुध्द दिशेने येत असलेल्या (क्र.एमएच १२/एमडब्ल्यू ६९०१) या भरधाव कारची या रिक्षाला समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट व राहुल भुंबर यांना मिळताच त्यांनी तातडीने जखमीना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर येथे आणले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिघांनाही तात्काळ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच मोहम्मद शकूर मोहम्मद गप्फूर यांचा मृत्यू झाला. भुरी प्रविण शेख गुड्डी व आठ वर्षीय मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.