अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा शहरात ब्राम्हणसभा कॉलनी व खापर्डे प्लॉट परिसरात दसर्याच्या रात्री (दि.२) पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 13 संशयीतांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकाचा बिश्नोई गॅंग सोबत संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिल्ली–हरियाणा गँगमधील काही धोकादायक गुन्हेगार परतवाड्यात लपून बसले असल्याचा संशय होता. या माहितीनुसार नागपूर व अमरावती गुन्हे शाखेच्या पथकांनी शहरात गुप्त ऑपरेशन सुरू केले आणि तेरा संशयितांना ताब्यात घेतले. यापैकी एक व्यक्ती हा बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचा संशय असून, त्याची कसून चौकशी सुरु आहे. परंतू पोलिसांनी अद्याप याविषयी स्पष्ट माहिती दिलेली नाही.
पहिल्या छाप्यामध्ये ब्राम्हणसभा कॉलनीतील अंकुश जवंजाळ यांच्या घरात भाड्याने राहणार्या संशयितांकडे पोलिस पोहोचले. दरवाजा बंद होता आणि आतून शांतता पसरलेली होती. दरम्यान तेव्हाच पोलिसांनी हवेत वार्निंग फायर केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले. पोलिस दरवाजा तोडून आत शिरले आणि ८ संशयितांना ताब्यात घेतले. पहिल्या कारवाईनंतर चौकशीत उघड झाले की खापर्डे प्लॉट परिसरातील सेवानिवृत्त कृषी अधिकारी वासुदेव खलेलकर यांच्या घरात भाड्याने राहणार्या आयुर्वेदीक औषध विक्रेत्याच्या खोलीत आणखी ४ संशयित थांबले होते. तिथे छापा मारून हे तरुणही पोलिसांच्या ताब्यात आले.
एकूण १३ संशयितांना ताब्यात घेतले, मात्र कोणाकडेही घातक शस्त्र सापडले नाही. तरीही यातील एक व्यक्ती कुख्यात हरियाणातील लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसर गोंधळलेला होता. नागरिक मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त व गोळीबार ऐकून घाबरले, तर दुसर्या दिवशी या धाडसी कारवाईसंबंधी सर्वत्र वेगवेगळया चर्चा होत्या.