

अमरावती : पंचवटी चौक ते अमरावती तहसील कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसकडून शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. तर याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान पंचवटी चौकात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याची स्थिती निर्माण झाली.
त्यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्र्यांचा जल्लोष करत होते. या दरम्यानच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यासमोर पावसामुळे सडलेले सोयाबीन फेकून आपला रोष व्यक्त केला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवले. दरम्यान पोलिसांसोबतही बाचाबाची झाली.राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. शेतकरी संकटात सापडला असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चौकशी करण्यापेक्षा राज्य सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी सत्कार सोहळ्यांना उपस्थिती लावत आहेत, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनासंदर्भात जाब विचारण्याचा प्रयत्नही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला.