अमरावती : भूमी अभिलेख कार्यालयात एका घराच्या फेरफारासाठी ५० हजारांची लाच घेणार्या उपअधीक्षक व नगर परिक्षण भूमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (दि.३१) रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नगर परिक्षण भूमापक चंद्रशेखर पुंडलिकराव गोळे (वय ४३) आणि उपअधीक्षक अनिल पांडुरंग नेमाडे (वय ५५) यांचा समावेश आहे. हे दोघेही लाच प्रकरणात दोषी आढळले आहेत.
तक्रारदाराचा मुलगा परदेशात वास्तव्यास आहे. अमरावतीत कॅम्प परिसरात नवजीवन कॉलनीत त्याचे घर आहे. त्याने वडिलांच्या नावे पॉवर ऑफ अॅटर्नी करून घराच्या फेरफारासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. अर्जावर निर्णय तक्रारदाराच्या बाजूने लागल्यानंतर, चंद्रशेखर गोळे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १ लाख २५ हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने १० जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पडताळणी दरम्यान, तडजोडीअंती गोळे यांनी ५० हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये उपअधीक्षक अनिल नेमाडे यांचाही सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. ३१ जुलै रोजी एसीबीने भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचून चंद्रशेखर गोळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, त्यानंतर अनिल नेमाडे यांनाही अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे, योगिता इकारे, ज्ञानोबा फुंड, युवराज राठोड, आशिष जांभोळे, वैभव जायले, उपेंद्र थोरात आणि विनोद धुळे यांच्या पथकाने केली.