

Amravati Farmer Bull Electrocuted
अमरावती: तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबा शिवारात गुरुवारी (दि.२४) तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून एका शेतकर्याचा व बैलाचा मृत्यू झाला. मृत शेतकर्याचे नाव अशोक सोनोजी शेंडे (वय ५०, रा. निंबा) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शेंडे हे सकाळी आपल्या बैलजोडीला घेऊन शेताच्या दिशेने निघाले होते. याच दरम्यान, रमेश देशमुख यांच्या शेताजवळून जाणार्या वीज वितरण कंपनीच्या तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना आणि बैलांना जोरदार विजेचा शॉक बसला.
सदर तार हायटेंशन असल्यामुळे करंटचा जोर अधिक होता. मृत्यू झालेल्या बैलजोडीपैकी एका बैलाची किंमत सुमारे ७० हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दिनेश नारायण गवई यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत एक अन्य मजूर गंभीर जखमी झाला आहे. यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरणच्या कर्मचार्यांना कडक शब्दांत सुनावले. त्यांनी पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आणि संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला.
घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी आणि तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे पंचनामा केला. मृत अशोक शेंडे यांच्या मागे पत्नी मुलगा व एक मुलगी आहे. या दुर्घटनेमुळे गावकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महावितरणच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गावकर्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.