हिंसक आंदोलनांमुळे विस्कळीत झालेले अमरावती शहरामधील सर्व व्यवहार आता सुरळीत झाले असल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली. हिंसाचारप्रकरणी आजवर 314 आरोपींविरुद्ध एकूण 57 गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये मागील आठवड्यात त्रिपुरातील मशिदीवरील कथित हल्ल्याच्या विरोधात मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. या हिंसाचाराविरुद्ध दुसर्या दिवशी भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यानही हिंसाचार झाला. नंतर शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था कायम आहे; मात्र आता शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले
आहेत, असे डॉ. आरती सिंह म्हणाल्या.
सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रात्री 9 पासून दुसर्या दिवशी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे, असे सिंह यांनी सांगितले.