अमरावती; पुढारी वृत्तसेवा : चांदूर बाजार तालुक्यातील कारंजा बहिरम ग्रामपंचायतचे सरपंच लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अलगद अडकले. तालुक्यातील लाखनवाडी येथील गुणवंत महाराजांच्या मंदिर परिसरात ३२ हजारांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ आज (दि.३) पकडण्यात आले. गणेशराव मोहोड असे अटक केलेल्या सरपंचाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार समर्थ फाऊंडेशनला बहिरम यात्रेत लावणी स्पर्धा आयोजित करावयाची होती. त्यासाठी सदर संस्थेला कारंजा बहिरम ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी संस्थेच्या संचालकांनी प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी कारंजा बहिरमचे सरपंचांनी तक्रारकर्त्याकडे ३२ हजारांची मागणी केली. तेव्हा तक्रारकर्त्यांनी १ फेब्रुवारीला लाचलुपत कार्यालयात संबंधित सरपंचाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची रितसर पडताळणी करून लाचलुचपत विभागाने सापळा रचून संबंधित सरपंचास ताब्यात घेतले.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरूण सावंत, स.पो.अ. देविदास घेवारे यांच्यासह संजय मदाम, एस. एस. भगत, अमोल कडू, योगेश धंदे, माधुरी साबळे, विनोद कंजाम, शैलेश कडू, संतोष किटूकले यांनी केली.
हेही वाचलंत का ?