विदर्भ

अमरावती : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस

अविनाश सुतार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधातून एका तरुणाचा काठीने जबर मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना ३० नोव्हेंबररोजी दुपारी वलगाव ठाण्याच्या हद्दीतील शिराळा येथे घडली होती. या प्रकरणी खून झालेल्या तरुणाच्या आईने तब्बल ३० दिवसांनी गुरुवारी (दि. २९) फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपीस अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश प्रल्हाद सोनोने (वय ३०, रा. शिराळा) असे खून झालेल्या तरुणाचे, तर शेखर राजेंद्र तायडे (वय २८, रा. शिराळा) असे आरोपीचे नाव आहे.

अंकुशचे शेखरच्या परिचयातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून शेखरने ३० नोव्हेंबर रोजी दुपारी अंकुशला काठीने जबर मारहाण केली. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझ्या कुटुंबीयांना जिवे ठार मारेन, अशी धमकीही शेखरने यावेळी अंकुशला दिली होती. त्यामुळे अंकुशने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. दरम्यान, मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या अंकुशला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून आई व बहिणीने त्याला डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

परंतु, २ डिसेंबररोजी अंकुशचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या वेळी अंकुशला शेखर तायडे याने काठीने जबर मारहाण केली होती, अशी माहिती त्याच्या आईला मिळाली. मात्र, शेखरची भीती व मुलाच्या मृत्यूच्या दु:खात त्यांनी कुणाला काही सांगितले नाही. अखेर गुरुवारी (दि. २९) अंकुशच्या आईने हिंमत करून वलगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. आईची तक्रार व वैद्यकीय अहवालाच्या आधारावर वलगाव पोलिसांनी आरोपी शेखर तायडे याच्याविरुद्ध खून व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT