Fort Tourist Attraction AI Photo
अकोला

Narnala Fort Akola | नरनाळा पर्यटनास पर्यटकांचा वाढता प्रतिसाद

जंगल सफारीसह बोटिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंगमुळे पर्यटकांची संख्या वाढली

पुढारी वृत्तसेवा

Narnala Fort Tourist Attraction

अकोला : सातपुड्याच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक नरनाळा किल्ला सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. जंगल सफारी, बोटिंग, ट्रेकिंग, सुळई धबधबा, व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग अशा विविध उपक्रमांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

समुद्रसपाटीपासून सुमारे ३ हजार १६१ फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ ३९२ एकर असून, किल्ला सुमारे २४ मैल (३८.५ किमी) लांब आहे. किल्ल्यात २२ तलाव, २२ दरवाजे आणि सुमारे ३६० बुरुज आहेत. महाकाली दरवाजा, जाफराबाद व तेलियागड यांसह ऐतिहासिक वास्तू पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागातर्फे पर्यटकांसाठी नरनाळा किल्ला जंगल सफारी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत जंगल सफारीची सुविधा असून, ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत एक हजार ६२३ जिप्सीतून ९ हजार १२ पर्यटकांनी सफारी केली. तर ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत दोन हजार ७६२ जिप्सीतून तब्बल १५ हजार ४८७ पर्यटकांनी सफारीचा आनंद घेतला.त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत पर्यटनाला मोठी चालना मिळाल्याचे दिसून येते.

मान्सून कालावधीत पर्यटन उपक्रमांवर काही निर्बंध असले तरी १५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान पर्यटकांना कुठर परिसरातील ट्रेकिंग व सुळई धबधबा येथे जाण्याची संधी मिळते. तसेच सुळई नाला परिसरात साहसी खेळांसाठी परवानगी दिली जाते.

नरनाळा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोपटखेड धरण येथे बोटिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. स्थानिक युवकांना वनविभागामार्फत प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, फेब्रुवारी २०२६ पासून आतापर्यंत ७ हजार ११० पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतला आहे.

पर्यटकांच्या सोयीसाठी शहानूर संकुल येथे नवीन सहा टेंट आणि सहा हट्स उभारण्यात आले आहेत. तसेच १४ बेडच्या दोन डॉर्मेटरीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नवीन पूल, भव्य सफारी गेट, मचान, गॅझिबो, व्हीआर गॉगल स्क्रिनिंग, मिनी थिएटर आणि सेल्फी पॉइंट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून कॅन्टीनची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.

नरनाळा महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक संस्कृती, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळत असून, वाढत्या पर्यटक संख्येमुळे परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. जंगल सफारी, ट्रेकिंग, सुळई धबधबा, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग आणि बोटिंगचा अनुभव घेण्यासाठी अधिकाधिक पर्यटकांनी नरनाळ्याला भेट द्यावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT