शिवसेना वाचविण्याचे काम आपण केले आहे. मी डॉक्टर नाही; पण ऑपरेशन करतो असे म्हणत करेक्ट कार्यक्रम करतो. हे आपण 2022 मध्ये पाहिले आहे. अकोल्यात घासून, पुसून नाही तर ठासून विजय मिळवायचा आहे, असा निर्धारही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.
Akola Municipal Election 2026
अकोला : पुढारी वृत्तसेवा
जे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार समजतात ते कार्यकर्त्यांसाठी फिरकत नाहीत. कारण त्यांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलाय. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना घरी बसविले. मी कार्यकर्ता म्हणून काम करणारा मालक आहे. काही लोक स्वतःला मालक समजतात त्यामुळे पक्ष मोठा होत नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.७) ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. महापालिका निवडणूक प्रचारार्थ अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा चेला आहे. दिलेला शब्द मी पाळतो. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना दहा वेळा, शंभर वेळा विचार करा. शब्द दिला की माघार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मै एक तो कमिटमेंट करता नही. मैने एकबार कमिटमेंट कर दी तो मै खुद की भी सुनता नही."
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी मला लाडका भाऊ ही नवी ओळख राज्यभर दिली आहे. कोणी माईकलाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
आम्ही अकोला शहराच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत. मनपा निवडणुकीत विजय झाल्यास अकोला शहरातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देऊ, मोर्णा व विद्रुपा नदीवरील पूर संरक्षण भिंत, प्रत्येक प्रभागात बाळासाहेब ठाकरे उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे सुशोभिकरण, बंद नाट्यगृह लोकसेवेत आणू, शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पदभरती करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड, माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना वाचविण्याचे काम आपण केले आहे. मी डॉक्टर नाही; पण ऑपरेशन करतो असे म्हणत करेक्ट कार्यक्रम करतो. हे आपण 2022 मध्ये पाहिले आहे. अकोल्यात घासून, पुसून नाही तर ठासून विजय मिळवायचा आहे, असा निर्धारही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.