Akola Missing Woman Reunited Pudhari
अकोला

Akola Missing Woman | हरविलेल्या महिलेची पाच वर्षांनंतर कुटुंबीयांशी पुनर्भेट

आधार नोंदणी ठरली कुटुंब शोधण्याचा महत्त्वपूर्ण दुवा

पुढारी वृत्तसेवा

Akola Missing Woman Reunited

अकोला : रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला  तब्बल पाच वर्षांपासून कुटुंबापासून दूर असलेल्या एका हरविलेल्या महिलेची अखेर तिच्या पती, मुलगी आणि भावासोबत पुनर्भेट झाली. आधार नोंदणी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय यांच्या माध्यमातून या महिलेचा कुटुंबीयांपर्यंत शोध घेणे शक्य झाले.

महिला व बाल विकास विभाग, अमरावती विभागांतर्गत अकोला येथील शासकीय महिला राज्य गृहात निराधार, निराश्रित, पीडित तसेच हरविलेल्या महिलांना निवारा व आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. अशाच प्रकारे एका हरविलेल्या महिलेला पोलिसांमार्फत महिला राज्य गृहात दाखल करण्यात आले होते. ही महिला अत्यल्प बोलत असल्याने तसेच तिला स्वतःचे गाव, कुटुंबाचे नाव किंवा पत्ता सांगता येत नसल्यामुळे तिच्या कुटुंबाचा शोध घेणे मोठे आव्हान होते.

महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला यांच्या माध्यमातून महिला राज्य गृहात आधार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सदर महिलेची आधार नोंदणी करण्यात आली. मात्र आधार कार्ड प्राप्त न झाल्याने   आधार ग्राहक सेवा प्रतिनिधींशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी आधार नोंदणी डुप्लिकेटमध्ये दर्शविल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली.

सुमारे १५ दिवसांनंतर महिलेचा जुना नामांकन क्रमांक प्राप्त झाला. हा क्रमांक UIDAI, मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आला. तेथून आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर महिलेचे बोटांचे ठसे घेऊन आधार कार्ड डाउनलोड करण्यात यश आले. आधार कार्डवर कुपटी, तनूर, जिल्हा आदिलाबाद, तेलंगणा असा पत्ता आढळून आला.

या पत्त्याच्या आधारे महिलेच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आदिलाबाद जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून महिलेचे छायाचित्र व आधार कार्डाची प्रत पाठविण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास करून महिलेच्या कुटुंबाचा शोध घेतला. संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांनी महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधून महिलेचे पती व भाऊ पोलिस ठाण्यात उपस्थित असल्याची माहिती दिली.

यानंतर महिला राज्य गृहात  व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून महिलेचा तिच्या पती व कुटुंबीयांशी संपर्क घडवून आणण्यात आला. तब्बल पाच वर्षांनंतर आपल्या कुटुंबीयांना पाहून महिला आणि तिचे कुटुंबीय भावूक झाले.

महिला राज्य गृहाच्या अधीक्षिका जयश्री हिवराळे यांनी महिलेच्या पतीला पुढील पुनर्वसन व कुटुंबाकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती दिली. त्यानुसार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी महिलेचे पती, मुलगी व भाऊ अकोला येथे उपस्थित झाले. आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या हस्ते सदर महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी महिलेचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. आधार नोंदणीपासून UIDAI कार्यालयाशी संपर्क, आधार क्रमांक प्राप्त करणे, आधारवरील पत्त्याच्या आधारे आदिलाबाद पोलिसांशी संपर्क साधणे आणि अखेर कुटुंबीयांशी संपर्क घडवून आणणे या संपूर्ण प्रक्रियेत सुनील लाडूलकर यांनी मोलाची भूमिका बजावली.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पूसदकर, महिला राज्य गृहाच्या अधीक्षिका जयश्री हिवराळे, परिविक्षा अधिकारी विद्या देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर तसेच महिलेचे नातेवाईक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT